पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद भारतीय जवानांना मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने श्रध्दांजली

91

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – मराठवाडा जनविकास संघाच्या पिंपळेगुरव येथील कार्यालयाच्या प्रांगणात पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या  जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे सर्व कार्यकर्ते व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष  अरूण पवार  म्हणाले की, आपण सर्वजण शहीद जवानांच्या कुटूंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. आपण आपल्या मातृभूमीचे काहीतरी देणे लागतो व म्हणून मराठवाडा जनविकास संघ व सर्व सहकारी बांधवांच्या वतीने महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शहीद संजय राजपूत व शहीद नितीन राठोड या जवानांच्या कुटूंबियांना प्रत्यक्ष त्यांच्या गावी जाऊन प्रत्येकी ५१००० रुपये असे १ लाख २००० रुपये मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कृष्णाजी खडसे, प्रा. संपत गर्जे , सूर्यकांत कुरूळकर, वामन भरगांडे, प्रकाश बंडेवार, अनिस पठाण, बाळासाहेब धावणे, माळी  आदींनी श्रध्दांजलीपर मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व बंधूभगिणींनी मेणबत्त्या प्रज्वलित करून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.