पुरूषी अहंकारामुळे सोनू सूदने चित्रपट सोडला- कंगना रणौत

350

मुंबई, दि. १ (पीसीबी) – अभिनेत्री कंगना रणौतच्या आगामी ‘मणिकर्णिका: द क्वीन झांसी’ या चित्रपटातून अभिनेता सोनू सूदने अचानक काढता पाय घेतला. या चित्रपटाचे दिग्दर्शन काही काळासाठी कंगना करत आहे. त्यामुळे कंगनाला वैतागून त्याने चित्रपट सोडला का अशा चर्चांना उधाण आले होते. पण सोनूने महिला दिग्दर्शनाखाली चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे कंगनाने स्पष्ट केले. पुरूषी अहंकारामुळे त्याने माघार घेतली असा अप्रत्यक्ष टोलाच तिने लगावला आहे.

सोनूच्या एक्झिटविषयी कंगनाने स्पष्ट केले की, ‘गेल्या वर्षी दिग्दर्शक क्रिश याच्यासोबत एकत्र काम केल्यानंतर माझी आणि सोनूची भेट झालीच नाही. तो ‘सिम्बा’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. चित्रीकरणासाठी त्याने मला अंदाजे तारखासुद्धा सांगितल्या नाहीत. निर्मात्यांनी त्याला चित्रपट दाखवला आणि पटकथालेखकांनी त्याला त्याची भूमिकाही समजावून सांगितली. त्याने मला भेटण्यास नकार दिला. महिला दिग्दर्शनाखाली काम करण्यास त्याने साफ नकार दिला आणि त्यामुळे मलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. माझ्या दिग्दर्शनावर पूर्ण विश्वास असल्याचे चित्रपटाच्या टीमने त्याला सांगितले पण कदाचित सोनूला विश्वास नाही असे दिसते.