पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा दिसला; नारायण राणेंचा टोला  

456

मुंबई, दि. १० (पीसीबी) –  वाढत्या  इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने देशभरात आज (सोमवार) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्यावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी मुंबईत ‘भारत बंद’चा परिणाम दिसून आला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.  

मुंबईत बंदचा परिणाम दिसला नाही, मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पुन्हा दुटप्पी भूमिका पाहायला मिळाली. शिवसेना इंधन दरवाढीवर बोलते. एकीकडे महागाईवर बोलायचे पण दुसरीकडे सत्तेला चिटकून राहायचे, यामधील सातत्य आज दिसून आले आहे, असा टोला राणे यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.

शिवसेना नेहमीच कोलांट्याउड्या मारते. दुटप्पी भूमिका म्हणजे शिवसेना. महागाईसाठी जेवढी भाजप जबाबदार आहे तेवढीच शिवसेनाही जबाबदार आहे. कारण केंद्रात आणि राज्यात दोघेही सत्तेत आहेत. सत्तेत असताना विरोध करतात, मग आज बंदमध्ये सहभागी व्हायला पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही, याचे कारण सत्ता आहे,  अशी टीका नारायण राणे यांनी केली .