पुण्यात २५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

55

पुणे, दि. १४ (पीसीबी) – ‘ओम् नमस्ते गणपतये… गजानना, गजानना…ओम गं गणपतये नम:… मोरया, मोरया…’ च्या जयघोषाने तब्बल २५ हजारापेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. यावेळी परदेशी पाहुणे ही उपस्थित होते. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरूवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत ऋषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भरलेल्या वातवरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला. अथर्वशीर्षसोबत झालेली महाआरती आणि इंधन वाचवाचा संदेश देत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी फिनोलेक्सच्या रितू छाब्रिया, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, आमदार डॉ.नीलम गो-हे, पं.वसंतराव गाडगीळ, एमएनजीएलचे वाणिज्यीक संचालक संतोष सोनटक्के, ट्रस्टचे महेश सुर्यवंशी, उल्हास भट, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, अभिजीत कोद्रे, मंगेश सुर्यवंशी, यतिश रासने, राजेश सांकला यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.