पुण्यात २० लाखांची रोकड जप्त

218

पुणे, दि. १२ (पीसीबी) – निवडणूक आयोगाच्या स्थिर स्थावर पथकाने पोलिसांच्या मदतीने आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास तब्बल २० लाख रुपयांची रोकड पुण्यातील मुकुंदनगर भागात पकडली आहे. ही रक्कम जप्त करून स्वारगेट पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास स्थिर स्थावर पथक क्र. १ चे अधिकारी सचिन प्रकाश पवार, आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका तथा इलेक्शन मॅजिस्ट्रेट हे त्यांच्या सहकाऱ्यांसह मुकुंद नगर भागातील रांका हॉस्पिटल चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. यावेळी त्यांना एक कार संशयास्पदरित्या येताना दिसली. ही कार थांबवित डिकीची तपासणी केली असता त्यामध्ये २० लाख रुपयांची रोकड मिळून आली.

ही कार राजेश रतनचंद ओसवाल (वय ४९, व्यवसाय – व्यापार, रा. ए ११०३, डीएसके चंद्रदिप, मुकुंद नगर) यांची आहे. पवार यांनी यासंदर्भात भरारी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत देंडगे यांना या पैशांबद्दल माहिती दिली.  ही रोकड जप्त करुन स्वारगेट पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात जमा करण्यात आली आहे.

दरम्यान, ओसवाल हे तेलाचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडील रक्कम ही दिवसभरातील तसेच काही वार्षिक व्यवहारातील आहे. बँक बंद झाल्याने स्वतः च्या दुकानातून ती रक्कम ते घरी नेत होते, असे त्यांचे म्हणने आहे. तर या पैशांबाबत पुरावा घेवुन येथुन पुढील सात दिवसांच्या आत निवडणूक खर्च समन्वय अधिकारी, जिल्हा निवडणुक खर्च सनियंत्रण समिती, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे अथवा आयकर विभागाच्या संदर्भात सह संचालक, आयकर विभाग(अन्वेषण) यांच्याकडे अपील करण्याच्या सूचना ओसवाल यांना देण्यात आल्या आहेत.