पुण्यात हौसेसाठी पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला पिस्तुलासह अटक

143

पुणे, दि. १७ (पीसीबी) – हौसेसाठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी पिस्तूल आणि एका जिवंत काडतूसासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळ करण्यात आली.

अभिषेक दीपक दीक्षित (वय २५, रा. जनता वसाहत) असे गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सुधीर घोटकुले यांना, सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक तरुण पर्वती दर्शन येथे संशयास्पदरीत्या फिरत असून त्याच्याकडे बंदुकीसारखे हत्यार असल्याची खबर मिळाली. याबाबतची माहिती घोटकुले यांनी पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांना दिली. त्यानुसार परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेवारे, पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ, महेश गाढवे, तानाजी निकम, रविंद्र फुलपगारे, रोहन खैरे, सागर सुतकर, विकास कदम, शिवाजी क्षीरसागर व राहुल ओलेकर यांच्या पथकाने सापळा रचला. लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळील जय भवानी हॉटेलसमोरुन संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीची २५ हजार रुपये किमतीची एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.