पुण्यात सिंहगडाच्या घाट रस्त्यावर दरड कोसळली; वाहतूक बंद

17

पुणे, दि. ८ (पीसीबी) – सिंहगड घाटात आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास दरड कोसळी. यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. दरड हटवण्याचे काम सुरू असून वीकेंड आणि पावसाचा योग साधून सिंहगडावर जाण्याचा बेत आखलेल्या हजारो पर्यकांची निराशा झाली आहे.

हवेली पोलिस आणि वन विभागाने गडावर जाणारा रस्ता बंद केला आहे. पावसाळा, त्यातही रविवार असल्यामुळे हजारो पर्यटक खडकवासला, सिंहगडावर धाव घेतात. परंतू या घटनेमुळे गडावरील रस्ता बंद होऊन अनेकांना अर्ध्या वाटेतून माघारी जावे लागले.

दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले असून यासाठी किती कालावधी लागणारा याची निश्चित माहिती देता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. मात्र आज (रविवारी) दिवसभर रस्ता बंद राहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षी ३० जुलै रोजी संध्याकाळी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, तिथे जवळच आजचा प्रकार घडला आहे. गेल्या वर्षी सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळून असंख्य पर्यटक गडावर अडकून पडले होते.

सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मातीचा ढिगारा काढण्यात यश आल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करून या पर्यटकांची सुटका करण्यात आली होती. यंदा सुदैवाने पहाटे हा प्रकार घडल्याने गडावर पर्यटक नव्हते.