पुण्यात विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्रांबाबत शाळेच्या जाचक अटी; पालकांचा शिक्षण सहसंचालकांना घेराव

125

पुणे, दि. ४ (पीसीबी) – शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या आणि स्किन रंगाची अंतवस्त्रे घालावी, स्कर्टची लांबीही ठरावीक असावी, अशाप्रकारच्या सुमारे २० ते २२ जाचक अटींची सक्ती माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने केली आहे. याविरोधात संतप्त पालकांनी आज (बुधवारी) प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घालून शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी केली.  

या शाळेने विद्यार्थिनींनी सौदर्य प्रसाधने वापरू नयेत, टॅटू काढू नयेत, लिपस्टीक, लिप ग्लॉस किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स वापरू नयेत, कानातील सोडून कोणतेच दागिने घालायचे नाहीत, कानातील दागिन्यांचा  रंगही काळा, सोनेरी किंवा चंदेरीच असावा, विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या परवानगीशिवाय कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये. प्रशासन आणि माध्यमांसोबत पालकांनी संवाद साधू नये, आदी अटी घातल्या आहेत.

पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करू नये, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, विद्यार्थ्यांनी केस एकदम लहान ठेवावे अशा विचित्र आणि जाचक अटी घातल्याने माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी संतप्त पालकांनी केली आहे.