पुण्यात रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे ठेवून अपघात घडवण्याचा प्रयत्न  

131

पुणे, दि. १८ (पीसीबी) – पुणे रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे ठेवून मोठा अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न अज्ञातांकडून होत आहे, अशी धक्कादायक माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली आहे.

गेल्या ३ ते ४ महिन्याच्या कालावधीत ८ ते १० वेळा अशा प्रकारच्या घटना पुणे रेल्वे विभागात समोर आल्या आहेत. यासंदर्भात रेल्वे पोलिसांकडे तक्रार ही देण्यात आली आहे. या सर्व घटनांमध्ये लोको पायलट व रेल्वे अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे हे अपघात टाळण्यात रेल्वे विभागाला यश मिळाले आहे.

एप्रिल महिन्यात हातकणंगले परिसरात दोन वेगवेगळया ठिकाणी अज्ञातांनी लोखंडी तुकडे रेल्वे रूळांवर टाकून अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीच तळेगावमध्ये कामशेत येथे हैद्राबाद मुंबई एक्सप्रेसलादेखील लक्ष्य करण्यात आले होते.

दरम्यान, ज्यांना पण अशा प्रकारे रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे ठेवणारे व्यक्ती किंवा संशयित कोणी दिसले. तर लगेचच रेल्वे विभाग किंवा पोलिसांना कळविण्यात यावे, असे आवाहन पुणे रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.