पुण्यात रेल्वेतील प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका मारून महागडे मोबाईल चोरणारा सराईत गजाआड

824

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – रेल्वेतील प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका मारून महागडे मोबाईल चोरणाऱ्या एका  सराईत चोराला पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचे १२ महागडे मोबाईल जप्त केले आहेत.

शाहरुख रशीद खरादी  असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम तुपधर (वय १८, रा.पुणे स्टेशन) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेम तुपधर यांचा २२ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने हातावर काटीमारुन पळवून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे लोहमार्ग पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून शिवाजीनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख खरादी हा अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. लोहमार्ग पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून आरोपी काठी घेऊन शिवाजीनगर येथे रेल्वे ट्रॅकच्या कडेला चोरीच्या तयारीत असताना दिसताच त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपीकडे १ लाख ५५ हजार किमतीचे एकूण १२ मोबाईल आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. ही कारवाई लोहमार्ग पोलीस पुणे आणि स्थानिक लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.