पुण्यात रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यावर हल्ला; दीड कोटींचे हिरे चोरीला

439

पुणे, दि. २८ (पीसीबी) – पुणे स्टेशन परिसरात रांका ज्वेलर्सच्या एका कर्मचाऱ्यावर चोरट्यांनी हल्ला केला. पुणे स्टेशन परिसरात या कर्मचाऱ्याला चोरट्यांनी गाठले. त्यानंतर त्याला चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी लुटले. त्याच्याकडे असलेले दीड कोटींचे हिरे चोरट्यांनी लंपास केले.

अजय होगाडे असे या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार चार अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय होगाडे काही दिवसांपूर्वीच झवेरी बाजारातील दुकानात ऑफिस बॉय म्हणून नोकरीला लागला. तो मुंबईतील काळबादेवी भागात असलेल्या रांका ज्वेलर्समधून दीड कोटींचे हिरे आणि दागिने घेऊन पुण्यात गेला होता. पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ जवळ असलेल्या रिक्षा स्टँडजवळ अजय जेव्हा आला तेव्हा त्याला चार चोरट्यांनी  चाकूचा धाक दाखवला आणि मारहाण केली. तसेच त्याच्याकडे असलेले हिरे आणि दागिने लुटण्यात आले. बंडगार्डन पोलिस तपास करत आहेत.