पुण्यात मदतीच्या बहाण्याने मौलवीने केला तरुणीवर अत्याचार

826

पुणे, दि. २८ (पीसीबी) – तरुणीच्या घरच्यांसोबत ओळख असल्याचा फायदा घेत पुण्यातील एका मौलवीने ‘पुण्याला चल तुला शिक्षणासाठी मदत करतो’, असे सांगून मुंबईतील १९ वर्षीय तरुणीला पुण्यात आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी १९ वर्षीय पिडीत तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार युनूस हासिम शेख (वय ५०, रा. पर्वती, पुणे) या मौलवीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणीला सीएचे शिक्षण घेण्याची इच्छा होती.  तर आरोपी मौलवी याचे पीडित तरुणीच्या कुटुंबियांशी चांगली ओळख होती. या ओळखीचा फायदा घेऊन पीडित मुलीला शिकविण्याचे आमिष दाखवून युनूस शेख याने तिला मुंबईहून पुण्यात आणले. तिच्याकडून तिची मूळ शैक्षणिक कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात ठेवून ती नष्ट करण्याची धमकी देऊन तिच्यावर पर्वती येथील राहत्या घरात तसेच मुंबईत लैंगिक अत्याचार केला. तसेच तिच्या आई-वडिलांचे बरेवाईट करण्याचीही धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला, अशा प्रकारची तक्रार पिडीत तरुणीने दत्तवाडी पोलिस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी त्यानुसार युनूस याला अटक केली आहे.  दत्तवाडी पोलीस अधिक  तपास करत आहेत.