पुण्यात भाजप कार्यालयात गुरूवारी अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थी कलश दर्शनासाठी ठेवणार

35

पुणे, दि. २२ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा  अस्थी  कलश गुरुवारी  ( दि.२३ ) सकाळी साडेदहा ते दुपारी ३ या वेळेत जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान, भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट सकाळी मुंबईहून पुण्याला अस्थी कलश आणणार आहेत,  अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली आहे.  

अस्थी कलशाचे दर्शन घेतल्यानंतर  तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीत अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.दरम्यान, मुंबई, पुणे, पंढरपूर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कर्जत, कराड, महाड व सांगली येथील नद्यांमध्ये अटलजींच्या अस्थी विसर्जित करण्यात येणार आहेत.

अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील एम्स् रूग्णालयात निधन झाले. १७ ऑगस्टला सायंकाळी नवी दिल्लीतील राजघाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अस्थी उत्तर प्रदेशातील गंगा नदीसह विविध नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या .