पुण्यात भक्तिमय वातावरणात गणराया विराजमान

44

पुणे, दि. १३ (पीसीबी) – पुष्परथातून दिमाखात मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात  वाजतगाजत श्री राजराजेश्वर मंदिरात दगडूशेठ हलवाई गणपतीचे आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’चा जयघोष, जल्लोषी वातावरण अशा भक्तिमय वातावरणात आज (गुरूवार) शहरात गणरायाचे दिमाखात आगमन झाले. 

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची वाजतगाजत मांगल्यपूर्ण वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ आणि तुळशीबाग गणपती मंडळाच्या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक मंडळांनी फुलांनी सजविलेल्या रथातून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. फुलांची आकर्षक आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

गणेश मिरवणुकांमुळे रस्ते फुलून गेले होते.  गणेश भक्तांनी पारंपरिक पध्दतीने  लाडक्या बाप्पांचे  मनोभावे स्वागत केले. ढोलताशांचा गजर..  बाप्पा मोरयाच्या घोषणांनी संपूर्ण आसंमत दणाणून गेला होता. या मिरवणुकांमध्ये तरुण आणि तरुणींचा मोठा सहभाग होता. सर्वत्र जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण होते.