पुण्यात पाकिस्तानी नाटक पाहते म्हणून पतीने पत्नीवर केले कोयत्याने वार

226

पुणे, दि. १२ (पीसीबी) – पत्नी वारंवार पाकिस्तानी नाटक पाहत असल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. ही थरारक घटना सोमवार (दि.११) सायंकाळच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील सॅलीस्बरी पार्क येथे घडली.

याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात पती आसिफ नायब (वय. ५० वर्षे, रा. सॅलीस्बरी पार्क)  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर नरगीस आसिफ नायब (वय. ४५ वर्षे, रा. सलीस्बरी पार्क) असे जखमी पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ आणि नरगीस हे पती-पत्नी आहेत. आसिफ यांचा होर्डींग लावण्याचा व्यवसाय आहे. तर नरगीस या गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. काही दिवसांपासून त्याच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद होत होते. यामुळे आसिफने नरगीसला धमकी देखील दिली होती. सोमवारी दुपारी त्यांची मुलगी ट्यूशनला गेली होती. तर घरी काम करणारी महिला कामासाठी आली होती. त्यांनी सासू, काम करणारी बाई यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर सासूवरच्या मजल्यावर राहात असल्याने त्या घरी गेल्या. त्यानंतर काम करणारी बाई फरशी पुसत होती. तर पती आसिफ टि. व्ही. पाहात होते. त्यावेळी नरगीस बेडरुममध्ये जाऊन मोबाईलवर युट्यूबवर पाकिस्तानी ड्रामा पाहात होत्या.

इतक्या आसिफ नरगीसजवळ कोयता घेऊन आले. नरगीसला कोयता दाखवून तुला पाकिस्तानी ड्रामा पाहू नकोस म्हणून सांगितलेल कळत नाही का ? असे म्हणत नरगीसच्या डोक्यावर सपासप वार केले. नरगीसने ते वार अडविण्यासाठी हात मध्ये घातला तर त्यांचा अंगठा तुटूला. त्यानंतर नरगीस यांनी आरडाओरड केली. तेव्हा शेजारच्या लोकांनी भांडणे सोडवून नरगीस यांना रुग्णालयात दाखल केले. आणि पोलिसांनी आसिफला अटक केली. स्वारगेट पोलीस तपास करत आहेत.