पुण्यात दुकानदाराचे अपहरण करुन खंडणीची मागणी; एकाला अटक

104

पुणे, दि. १९ (पीसीबी) – कोयत्याचा धाक दाखवून किराणा दुकानदाराचे अपहरण करत एक लाखांची खंडणी मागणाऱ्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली असून दुसरा गुन्हेगार फरार झाला आहे.  

याप्रकरणी दुकानदार आमराराम मुलाराम चांची (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश दिलीप मोडक (वय २४, रा. वडकी गाव) याला अटक करण्यात आली. तर त्याचा साथीदार रणजित पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांची आणि गणेश मोडक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. चांची हे १७ मे रोजी रात्री आठच्या सुमारास किराणा दुकानात असताना मोडक आणि त्याचा मित्र रणजित पवार तेथे आले. त्यांना दुकानाबाहेर बोलावले एक लाखाच्या खंडणीची मागणी केली. चांचीने पैसे देण्यासनकार दिला. तेव्हा गणेश मोडक याने त्यांच्या तोंडावर पाण्यासारखा पदार्थ टाकला. त्यांच्या गाडीतून कोयता काढून तो उलटा चांची यांना मारून जबरदस्तीने मोटारीत बसवले. तसेच मंतरवाडी फाटाजवळील पुलाकडून फुरसुंगीकडे जाणाऱ्या रोडवरुन त्यांना एका मोकळ्या जागेत नेले.

तेथे मोडक याने त्यांच्या गळ्याला कोयता लावून दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. जर तू खंडणी नाही दिली तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या खिशातील रोख ५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.त्यानंतर ते दोघे पळून गेले. यानंतर चांची यांनी इतर दुकानदारांशी चर्चा करुन हडपसर पोलिसात शनिवारी फिर्याद दिली. पोलिसांनी त्यानुसार मोडक याला अटक केली तर त्याचा साथीदार पवार याचा पोलीस शोध घेत आहेत.