पुण्यात जमिनीच्या वादातून ५५ वर्षीय इसमाचा खून

899

पुणे, दि. १४ (पीसीबी) – जमिनीचा वाद न्याय प्रविष्ठ असताना दोघा जणांनी मिळून आपसात वाद मिटवण्याचा बहाणा करत एका ५५ वर्षीय इसमाला दारु पाजून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. २९ ऑगस्ट) वडगाव बांडे येथे घडली होती.

बाळासाहेब सोनबा मुरकुटे (वय ५५, रा. शिरसवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी योगेश मुरकुटे आणि भाऊसाहेब माळवदकर या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब आणि आरोपींमध्ये बऱ्याच दिवसांपासून जमिनीचा वाद होता. त्याचे जमिनीचे प्रकरण न्याय प्रविष्ठ होते. २९ ऑगस्टला त्याची सुनावाई होती. यामुळे आरोपी आणि बाळासाहेब हे सुनावाईसाठी शिवाजीनगर न्यायालयात आले होते. सुनावाई झाल्यानंतर आरोपींनी बाळासाहेबांना आपन हे प्रकरण आपसात मिटवून घेऊ असे सांगून त्यांच्या कारमध्ये बसवले. तसेच त्यांना वडगाव बांडे येथे नेऊन दारु पाजली आणि त्यांना जबर मारहाण करुन भिमा नदीत फेकून दिले.

दरम्यान, जमिनीच्या सुनावाईसाठी शिवाजीनगर न्यायालयात गेलेले बाळासाहेब बराचवेळ घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. मात्र १ सप्टेंबरला एक मृतदेह दौंड तालुक्यातील मांडवगण फराटा येथे सापडला. पोलिसांनी तपास केला असता तो बाळासाहेब मुरकुटे यांचा असल्याचे समजले. तसेच त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावत असताना बाळासाहेबांचा जमिनीचा वाद होता असे समजले. यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी योगेश आणि भाऊसाहेब या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनीच खून केल्याचे कबुल केले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.