पुण्यात छोटा राजन, गजा मारणे टोळीतील दोघांना पिस्तुलांसहीत अटक

175

पुणे, दि. १४ (पीसीबी) – छोटा राजन टोळीतील सराईत गुंड अजय सुभाष चक्रनारायण आणि पुण्यातील गजा मारणे टोळीतील गुंड जमीर मोहिद्दीन शेख या दोघांना पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून २ पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पौड रोडवरील साई पॅलेस बारजवळ छोटा राजन टोळीतील सराईत गुंड अजय सुभाष चक्रनारायण आणि पुण्यातील गजा मारणे टोळीतील गुंड जमीर मोहिद्दीन शेख हे संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करुन दोघांना अटक केली आहे. या दोघांवरही कोथरूड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.