पुण्यात एका वर्षानंतर ऑनर किलिंगचा प्रकार उघड; मामा आणि चुलत भावानेच केला तरुणाचा खून

378

पुणे, दि. ७ (पीसीबी) – प्रेमविवाह केल्याने एका तरुणाचा त्याच्या मामाने आणि चुलत भावाने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोहगाव येथे  ( २० जुलै २०१७) मध्ये  घडली होती.

इंद्रजीत उमाशंकर गौड (वय २१, रा. निंबाळकर चाळ, लोहगाव, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक डी.जे.जाधव यांनी मामा कमलेश मल्लू गौड आणि चुलत भाऊ अमरनाथ दशरथ गौड (दोघेही, रा.मदनपुरा, उत्तरप्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  इंद्रजित उमाशंकर गौड याने नातेवाईकांचा विरोध पत्करुन २०१७ मध्ये प्यारी गौड हीच्या सोबत प्रेम विवाह केला होता. त्यामुळे त्याच्या सर्व नातेवाईकांनी त्याच्याशी संबंध तोडले होते. त्याचा मामा कमलेश आणि चुलत भाऊ अमरनाथ हे त्याच्यावर जास्तच नाराज होते. इंद्रजीतला धडा शिकविण्याचा त्यांनी विचार केला. २० जुलै २०१७ रोजी रात्री ते दोघे त्याच्या घरी गेले आणि त्यांनी इंद्रजीतला जबर मारहाण करत गळा दाबून त्याचा खून केला.  हा प्रकार उघडकीस आला तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. डॉक्टरांकडून शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला मात्र इतके दिवस त्याकडे दुर्लक्ष केले गेले. या शवविच्छेदन अहवालात अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याचा तपास केल्यानंतर आता शवविच्छेदन अहवालावरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप आरोपी मामा आणि चुलत भावाला अटक केलेली नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.बी.खेडकर तपास करत आहेत.