पुण्यात इस्टेटीच्या वादातून पतीने पत्नीला पेटवले

503

पुणे, दि. २८ (पीसीबी) – पत्नीच्या माहेराकडील इस्टेटीच्या वादातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये पत्नी गंभीररीत्या भाजली असून तीची प्रकृती चिंताजणक आहे. ही घटना रविवारी (दि.२६) रात्री बाराच्या सुमारास पुण्यातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात घडली.

सुरेखा जाधव (वय ५०, रा. सोमवार पेठ, पुणे) असे जळून गंभीर जखमी झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी तिने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार पती प्रदिप जाधव (वय ५१, रा. सोमवार पेठ, पुणे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा आणि प्रदिप हे पती-पत्नी असून त्यांच्यामध्ये सारखे इस्टेटीच्या कारणावरुन सारखे वाद व्हायचे. रविवारी जखमी सुरेखा यांच्या माहेराकडील इस्टेटीच्या वादातून दोघांमध्ये जोराचे भांडण झाले. यादरम्यान प्रदिप यांनी सुरेखा यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. या घटनेमध्ये सुरेखा या गंभीर जखमी झाल्या. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी पती प्रदिप याला अटक केली आहे. समर्थ पोलिस तपास करत आहेत.