पुण्यातून घातपात कटप्रकरणी आणखी दोन तरुणांना अटक   

956

पुणे, दि. ११ (पीसीबी) – नालासोपाऱ्यातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धरपकड कायम आहे. घातपात कटप्रकरणी आणखी दोन तरुणांना  पुण्यातून दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.

वैभव राऊत याच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांनी दावा केला आहे.

अटक केलेल्या आरोपींनी स्वत: टोळी करून घातपाताची तयारी सुरू केली होती की त्यांच्यामागे एखादी संघटना वा व्यक्ती आहे, याचा शोध घेण्यात येत आहे,असे ‘एटीएस’ने सांगितले आहे. आरोपी मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने तिघांना १८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.