पुण्यातील दत्तवाडीत पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार करुन जीवेमारण्याचा प्रयत्न

146

पुणे, दि. २५ (पीसीबी) – पुण्यातील दत्तवाडी परिसरात पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास दत्तवाडी परिसरात असलेल्या शनी मंदिराजवळ  घडली.

सूरज भालचंद्र यशवंत (वय २३, रा राजेंद्रनगर) असे गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रोहित उथडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित आणि जखमी सूरज हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वीही त्यांच्यामधे वाद होऊन भांडणे झाली होती. त्यावरुन त्या दोघांवरही गुन्हे दाखल आहेत. रविवारी रोहितचा वाढदिवस असल्याने तो मित्रांसह दत्तवाडीतील शनी मंदिराजवळ उभा होता. त्यावेळी सूरज त्याठिकाणाहून जात असताना त्यांच्यात परत वाद होऊन भांडण सुरु झाली.  यावेळी रोहितने त्याच्याजवळील पिस्तुलाने सुरजवर गोळी झाडली. ही गोळी सुरज याच्या पाठीला लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत