पुण्यातील कॉसमॉस बँकेवर ऑनलाईन दरोडा टाकल्याप्रकरणी दोघांना अटक

407

पुणे, दि. १२ (पीसीबी) – कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर ‘सायबर हल्ला’ करून ९४ कोटी रुपयांवर डल्ला मारल्याच्या घटनेत ‘सायबर सेल’ ने भिवंडी आणि औरंगाबाद येथून दोन जणांना अटक केले. तसेच पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

फहीम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स, भिवंडी) आणि फहीम अझीम खान (वय ३०, रा. सिमा हॉस्पिटलमागे, आझादनगर औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. तर महेश राठोड, कुणाल, अली, महंमद, अँथनी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी मिळून बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापूर येथील विविध एटीएम केंद्रातून ८९ लाख ४७ हजार ५०० रुपये काढल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या फहीम शेख आणि फहीम खान या दोघा आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ३ लाख ५५,४०० रुपये रोख, सहा हार्ड डिस्क, दोन सीडी, एक डीव्हीडी, दोन पेन ड्राइव्ह, दोन मोबाइल, १ सिमकार्ड जप्त केले आहेत. चतु:श्रृंगी पोलिस अधिक तपास करत आहेत.