पुण्यातील कुरिअर कंपनीत कर्मचाऱ्यानेच केली साडेपाच लाखांची चोरी

275

पुणे, दि. ७ (पीसीबी) – कुरिअर कंपनीत कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्यानेच खिडकीतून प्रवेश करून कंपनीतील तब्बल ५ लाख ५० हजारांची रक्कम चोरली होती. पोलिसांनी त्याला अवघ्या चार तासातच अटक केली. ही चोरी बुधवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास कोंढवा बुद्रुक येथील आंबेडकर नगरमधील डिलिव्हरी प्रायवेट लिमिटेड या कुरिअर कंपनीमध्ये झाली.

भीमा शिवाजी सोनावणे (वय २५, रा. पर्वती) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी दामिनी ठाकर (वय २५, रा. शिवाजीनगर) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भीमा सोनावणे हा कोंढवा बुद्रुक येथील आंबेडकर नगरमधील डिलिव्हरी प्रायवेट लिमिटेड या कुरिअर कंपनीमध्येच कामाला आहे. बुधवारी रात्री त्याने कंपनीच्या उघड्या खिडकीतून आता प्रवेश केला आणि कंपनीतील लॅकरमध्ये ठेवलेली ५ लाख ५० हजारांची रक्कम चोरुन नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यामधील व्यक्ती हा कंपनीतील कर्मचारी भीमा सोनावणे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने भिमाचा शोध घेऊन त्याला अवघ्या चार तासात अटक केली. तसेच त्याच्याकडून चोरी केलेली सर्व रक्कम जप्त केली आहे. कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.