पुण्यातील अमित शहांच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांना प्रवेश नाही

101

पुणे, दि. २८ (पीसीबी) – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे ८ जुलैला व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाला एलिट क्‍लास’लाच निमंत्रित करण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले जाते. विविध क्षेत्रातील ३ हजार लोकांना एकत्र आणण्यासाठी पुण्यातील शहर भाजप  व प्रदेश कार्यकारिणीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

‘चाणक्‍य’ या विषयावर शहा यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम विविध स्तरातील मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी घेण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. शहर कार्यकारिणीकडून कार्यक्रमाची निमंत्रणे पाठविण्यात येणार आहेत. तसेच  कार्यक्रमाचे नियोजन व प्रत्यक्ष कार्यक्रमाच्यावेळी लागणाऱ्या कामासाठी मोजक्याच कार्यकर्त्यांना कार्यक्रम स्थळी प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान, अमित शहा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून बूथ प्रमुख व केंद्र प्रमुखांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील काही प्रमुख व्यक्तींच्या भेटीही ते घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  विधानसभानिहाय तयारीचा आढावा शहा घेणार आहेत.