पुण्याच्या दिशेने निघालेल्या ‘शिवशाही’ बसला रायगडमध्ये अपघात; ३१ प्रवासी जखमी

793

पुणे, दि. २५ (पीसीबी) – दापोलीवरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ अपघात झाला. या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवारी) सकाळी शिवशाही बस दापोलीवरुन पुण्याच्या दिशेने निघाली होती. सव्वा अकराच्या सुमारास लोणेरेजवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात बस पलटल्याने ३१ प्रवासी जखमी झाले. लोणेरे गावातील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ हा अपघात घडला. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.