पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये गुरूवारी बंद राहणार

251

पुणे, दि. ८ (पीसीबी) –  मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांसह सार्वजनिक आणि अभिमत विद्यापीठे गुरूवारी (दि.९) बंद ठेवली जाणार आहेत. खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने याबाबतच्या सूचना पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

पुणे महापालिका आयुक्त, पुणे विद्यापीठ आणि इतर अभिमत विद्यापीठांच्या कुलसचिवांना कामकाज बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.

पुणे महापालिकेने देखील सर्व प्राथमिक, माध्यमिक महापालिका आणि खाजगी व्यवस्थापणाच्या शाळा बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुणे जिल्हातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी देशी विदेशी मद्य, ताडी विक्री गुरूवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.