पुणे विमानतळावर २८ लाखांचे सोने आणि दीड लाखांच्या विदेशी सिगारेट जप्त

118

पुणे, दि. ६ (पीसीबी) –  दुबईहून पुणे विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुडघ्याला बसवलेल्या नी कॅपमधून तब्बल २८ लाख ३० हजार रुपये किमतीचे ९२५ ग्राम सोने जप्त केले. ही कारवाई रविवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास पुणे विमान तळावर करण्यात आली.

मोहम्मद साफिर उमर सोबार (रा. चेन्नई) असे या प्रवाशाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी  पहाटेच्या सुमारास फ्लाईट जेट या विमानातून मोहम्मद पुण्याला  आला होता. यावेळी त्याच्या दोन्ही गुडघ्याला नी कॅप होत्या. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या नी कॅपमध्ये चार पॅकेट आढळले. या पॅकेटमध्ये सोन्याची पेस्ट आढळली. पोलिसांनी सोन्याची पेस्ट जप्त केली असून मोहम्मद याला अटक केली आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत रविवारीच विमानतळावर दाखल झालेल्या स्पाईस जेटच्या फ्लाईटमधून उतरलेल्या सात परदेशी नागरिकांकडून सिगारेट्सचे ८२१ बॉक्स जप्त करण्यात आले. या सिगारेट्सची किंमत १ लाख ६४ हजार रुपये इतकी आहे. या परदेशी प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उपायुक्त भारत नवले यांनी दिली आहे.