पुणे विद्यापीठाचे वेळापत्रक जाहीर

117

पुणे, दि. ३१ (पीसीबी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या प्रवेश परीक्षेसाठी 1 जूनपासून (सोमवार) ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख 30 जून आहे.
पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह देश, विदेशातील विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. विद्यापीठात पदव्युत्तर पदवी, पदवी, इंटिग्रेटेड कोर्स असे सुमारे 90 अभ्यासक्रमांचे शैक्षणिक विभाग आहेत. या अभ्यासक्रमांसाठी 100 गुणांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यात 20 गुण हे सामान्य ज्ञानावर असतात. उर्वरित गुण अभ्यासक्रमाशी निगडीत विषयांवर असतात.

प्रवेश परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. त्याचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. यासाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना 500 रुपये शुल्क तर मागासप्रवर्ग गटातील विद्यार्थ्यांसाठी 350 रुपये शुल्क आहे. शुल्क ऑनलाईनच भरावे लागेल.
पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे 77 विभाग आहेत, त्यांच्यासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना मागील वर्षाची उत्तीर्णतेची गुणपत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र याचे फोटोकॉपी अपलोड करावे लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक आहे.

WhatsAppShare