पुणे-बंगळुरू महामार्ग खुला; वाहतूक सुरू  

176

कोल्हापूर, दि. १२ (पीसीबी) – अतिवृष्टी आणि महापुरामुळे गेले आठ दिवसापासून बंद असलेला पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आज (सोमवार) खुला झाला. या मार्गावरील पाण्याची पातळी कमी  झाल्याने सकाळी  ६ वाजल्यापासून अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे.  केवळ अवजड वाहनांना  शिरोलीतून कोल्हापूरमध्ये सोडण्यात येत आहे.  

कर्नाटकातून कोल्हापूरच्या दिशेने येणारी वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. महामार्गाची पाहणी करून दुपारनंतर ही वाहतूक सुरू  होण्याची शक्यता आहे.  महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे. रविवारी  रात्री  पाणी कमी झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेला प्राधान्य देत काही टँकर सोडण्यात आले.

महामार्ग  बंद असल्यामुळे सातारा ते कर्नाटकातील तवंदी घाट या दरम्यान किमान ३५  हजार वाहने सात दिवसापासून अडकून पडली होती. दिवसभरात या महामार्गावरुन पाणी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि औषधे या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना  सोडण्यात आल्या.

मुसळधार पावसामुळे  पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दिशेने सांगली फाट्याजवळ पंचगंगेचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे ५ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करुन या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते.  त्यानंतर पुणे-बंगळुरु हा महामार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता.  तब्बल आठ दिवस  महामार्गावर पाणी असल्याने दोन्ही बाजूस  २५ हजाराहून अधिक वाहने अडकून पडली होती. आज महामार्ग खुला झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.