पुणे पोलिसांची मोठी कारवाई: नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली देशभरातून पाच जणांना अटक

160

पुणे, दि. २८ (पीसीबी) – नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली  देशभर संशयितांवर कारवाई सुरू आहे. पुणे पोलिसांच्या सहा पथकांकडून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, रांची, गोवा आणि हरियाणा या शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली. या कारवाईनंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

प्रसिद्ध कवी वारावर राव यांना हैदराबादमधून अटक केली आहे. ठाण्यात अरुण परेरा आणि मुंबईत व्हर्नोन गोन्साल्वीस यांच्या घरांची झाडाझडती घेऊन त्यांनाही अटक करण्यात आली आहे. सुधा भारद्वाज यांच्या रांचीमधून तर दिल्लीमध्ये गौतम नवलखा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सर्वांवर आयपीसीच्या कलम १५३ अ, ५०५(१)ब, ११७, १२० ब, १३, १६, अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे सर्वजण नक्षलवाद्यांसाठी शहरी भागात थिंक टँक म्हणून काम करत होते, असा पोलिसांना संशय आहे. या छाप्यातून महत्वाची कागदपत्र, पुस्तके, पत्रे आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत जे लोक सहभागी झाले होते, त्यांच्या घरांची झडती घेतली जात आहे. या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरवले होते, असे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर आज (मंगळवार) सकाळपासूनच पुणे पोलिसांच्या पथकांनी देशभरात विविध ठिकाणी एकाच वेळेस छापे मारले आहेत.