पुणेकरांनो सावध रहा; कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असतानाच काढला पळ

124

 

पुणे, दि.२३ (पीसीबी) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी स्वतःच सजगता दाखवून खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्यसरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीदेखील परदेशातून आलेल्या पुण्यातील काही कोरोनाबाधित रुग्णांनी उपचार सुरु असतानाच पळ काढला आहे. ही इतर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक बाब असल्याने पुणे पोलीसांनी बाधित रुग्णांना पुन्हा उपचारासाठी हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

परदेशातून आलेल्या या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केले होते. शिवाय त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे.मात्र त्यातील काहीजणांनी अचानक पळ काढला आहे. पुणे पोलिसांनी यांना हजर राहण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

यावेळी पुणे पोलिसांनी पुणेकरांनाही मदतीचे आवाहन केले आहे. त्यांना क्वारंटाइनचा शिक्का असलेला व्यक्ती दिसल्यास पुणे पोलिसांना 1800 233 4130 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे. गेल्या २४ तासात कोरोनाच्या १५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत १४, तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७४ वरुन ८९ वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाने राज्यात अधिक हात पाय पसरू नये यासाठी प्रशासनाकडून घरी राहण्याचे व समाजापासून स्वतःला अलग ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.