पुढील ५० वर्षे राज्य करायचे आहे, तयारीला लागा – अमित शहा

265

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – ‘सबका साथ सबका विकास’ हा अजेंडा घेऊन, समान विचारांच्या सूत्रांवर भाजपची शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी आहे. मात्र, त्यासाठी समोरून प्रतिसाद मिळला नाही तर, महाराष्ट्रात वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला दिला. मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पुढील ५० वर्षे राज्य करायचे आहे, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरवला.  

अमित शहा म्हणाले की, ‘राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. या राज्यात दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना असे तीन पक्ष एकत्र आले तरी या त्रिकुटावर मात करण्यासाठी तयारी करून महाराष्ट्रात भाजपची सत्ता कायम राहील, याची तयारी आताच करून ठेवा, असा आदेश त्यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

दादरच्या भाजपच्या कार्यालयात शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या २०१९च्या निवडणूक मिशनवर यावेळी चर्चा झाली.

दरम्यान, ज्येष्ठ गायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची अमित शहा यांनी रात्री नऊच्या दरम्यान भेट घेऊन, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.