पुढील एक वर्षात वाहतुक शिस्तीवर सकारात्मक परिणाम दिसणार – पोलिस आयुक्त पद्मनाभन

148

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला एक वर्ष पुर्ण झाले आहे. या वर्षात हव्या तेवढ्या सुधारणा झाल्या नाहीत. मात्र पुढील एक वर्षात गुन्हेगारी आणि वाहतुकीची शिस्त यावर सकारात्मक परिणाम दिसेल असे काम करुन, अशी कबुली आज (सोमवार) पोलिस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिली. ते चिंचवडगावातील महापालिकेच्या व्यापारी संकुलात उभारण्यात आलेल्या वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

या वेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव, रामचंद्र जाधव, श्रीकांत मोहिते, श्रीधर जाधव, चंद्रकांत अलसटवार, राजाराम पाटील, संजय नाईक पाटील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पद्मनाभन म्हणाले, पोलिस आयुक्तालयाला नुकतेच एक वर्ष पुर्ण झाले आहे. या वर्षात हवे तेवढे काम करता आले नाही. मात्र पुढील वर्षात गुन्हेगारी आणि वाहतुकीची शिस्त यावर सकारात्मक परिणाम दिसतील असे काम करु. आयुक्तालयातील एकुण २० टक्के कर्मचारी हे वाहतुक शाखेच्या सेवेत असायला हवेत मात्र आपल्याकडे मनुष्य बळाची कमतरता आहे. त्यामुळे बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते. चिंचवडगाव येथे उभारण्यात आलेल्या वाहतूक पोलीस मुख्यालयात उपायुक्‍त, सहायक आयुक्‍त, पोलीस निरीक्षक (नियोजन), पोलीस निरीक्षक (खटला) यांच्यासाठी कॅबिन तयार करण्यात आल्या आहेत.

याशिवाय वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष, समन्स बजावणी करणे व इतर कार्यालयीन कामकाजाकरिता जागा राखीव ठेवण्यात आली आहे. आगामी काळात या ठिकाणी शहरातील विविध चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमे-यांचे प्रेक्षपणही घेतले जाणार आहे. त्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याच इमारतीच्या दुसऱ्या भागात जागा रिक्‍त असून त्याठिकाणी पोलिसांचे अन्य कार्यालय सुरू करण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मानस असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.