पी-1, पी-2 चे निर्बंध हटविण्यासाठी सोमवारी पिंपरीत व्यापा-यांचे आंदोलन – श्रीचंद आसवाणी

55

पिंपरी,दि. 19 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पिंपरी कॅम्प मधील व्यापा-यांवर पी- 1, पी- 2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास निर्बंध घातले आहे. हे निर्बंध मागे घ्यावेत. याबाबत अनेकदा प्रशासनाशी पत्र व्यवहार केला आहे. व्यापा-यांच्या या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या विरुध्द पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या निषेध करीत पिंपरी कॅम्पमधील व्यापारी सोमवारी दुपारी एक वाजता शगुन चौक येथे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती पिंपरी मर्चंन्ट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी दिला आहे. फक्त पिंपरी कॅम्पमधील व्यापा-यांना पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने उघडी ठेवण्याचे बंधन मनपा प्रशासनाने घातले आहे. परंतू

पिंपरी कॅम्प परिसरात बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे पथारीवाले, फेरीवाले मात्र राजरोसपणे व्यवसाय करीत आहेत. ज्या बाजूची दुकाने बंद असतात त्या बाजूला पथारीवाले दुचाकीवर वस्तू विक्रीची दुकाने थाटतात. यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनची आहे. महानगरपालिका चारनंतर लगेचच व्यापा-यांवर खटले भरायला सुरुवात करते, परंतू बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे पथारीवाले, फेरीवाल्यांकडे का दुर्लक्ष करते हा प्रश्न आहे. मार्च 2020 पासून पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश काळ लॉकडाऊन मुळे व्यापा-यांना दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. जून महिण्यापासून अंशता: दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू मनपा प्रशासनाने व्यापा-यांचा विरोध डावलून फक्त पिंपरी कॅम्पमध्येच पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने उघडी ठेवण्याचे बंधन घातले आहे हे अन्यायकारक आहे.

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच पिंपरी मनपा प्रशासनाच्या हेकेखोरपणाचा निषेध करण्यासाठी पिंपरी कॅम्पातील सर्व व्यापारी सोमवारी (दि. 21) दुपारी एक वाजता शगुन चौकात आंदोलन करणार आहेत. याबाबतचे पत्र पिंपरी मर्चंन्ट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांना दिले आहे.

WhatsAppShare