पीएमपी बसमधील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी परिमंडळ तीनच्या पोलिसांनी सुरु केले सुरक्षा अभियान

106

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पीएमपी बसमधील वारंवार होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी पिंपरीतील परिमंडळ तीनच्या पोलिसांनी सुरक्षा अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत महिला पोलिस कर्मचारी पीएमपी बसमधील प्रवाशांची जनजागृती करणार आहेत. आज (शुक्रवार) याचा शुभारंभ पिंपरीतील आंबेडकर चौकातून करण्यात आला.

यावेळी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सुरक्षा अभियानाची माहिती देताना पोलिस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले, पीएमपीएमएल बसमधील वाढते सोनसाखळी चोरीचे प्रकार रोखण्यासाठी आणि ऑनलाईन फसवणुकीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी परिमंडळ तीनमध्ये हे सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. दररोज गर्दीच्या वेळी दोन ते तीन तास हे अभियान राबविण्यात येणार आहे. शहरातील गर्दीचे मार्ग तपासून ज्या मार्गावर जास्त चोरीचे प्रकार घडतात, त्या मार्गावर प्रथम आणि त्यासोबतच इतर मार्गांवर संबंधित पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या अभियानामुळे बसमधील चोरीच्या प्रकरणांवर आळा बसणार आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात पोलिस उपायुक्त शिंदे यांनी सुरु केलेल्या या अभियानामुळे प्रवासी नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.