पितृतुल्य ‘बापजीं’च्या निधनामुळे शाहरुख भावूक

934

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – देशाचे माजी पंतप्रधान आणि एक मातब्बर नेता म्हणून ओळख असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर संपुर्ण देशातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राजकारणी म्हणू नका किंवा मग कलाविश्वातील एखादा सेलिब्रिटी. प्रत्येकजण अटलजींना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन देत आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानही मागे राहिलेला नाही.

एक पंतप्रधान किंवा राजकीय नेता म्हणून वायपेयी यांनी अनेकांवर छाप पाडलीच. पण, एक व्यक्ती म्हणूनही त्यांचा वावर अनेकांच्याच मनात घर करुन गेला. अशा या महान नेत्याला जवळून पाहण्याची, त्यांच्यासोबतच काही क्षण व्यतीत करण्याची संधी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानलाही मिळाली होती. त्याच आठवणी जागवत शाहरुखने त्याच्या बापजींना अर्थात अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे.

सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये शाहरुखने गतकाळातील आठवणींना उजाळा दिला आहे. जेव्हा त्याचे वडील अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणांसाठी न्यायचे. कालांतराने प्रत्यक्ष त्यांची भेट घेण्याचा योग आला. ज्यावेळी शाहरुखने अटलजींसोबत कविता, चित्रपट, राजकारण या विषयांवर बराच वेळ चर्चाही केली होती. घरचे सर्व मंडळी त्यांना बापजी म्हणत, असंही त्याने या पोस्टमध्ये न विसरता लिहिलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे मी माझ्या बालपणाचा एक भाग हरवून बसलो आहे. त्यांच्यासोबतचा वावर आणि त्यांची भेट घेण्याची संधी मिळणं या साऱ्यासाठी मी स्वत:ला फार नशिबवान समजतो, असं लिहित शाहरुखने या कवीमनाच्या त्याच्या बापजींना श्रद्धांजली दिली.