पिकअप चालकावर खुनी हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

90

चाकण, दि. 24 (पीसीबी) : पिकअप समोर कार उभा करून पिकअप चालकाला ‘तुला गाडी नीट चालवता येत नाही का’ अशी दमबाजी करत तिघांनी मिळून पिकअप चालकाचे डोके लोखंडी पोलवर आपटले. यामध्ये पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 22) दुपारी खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण बबन शिंदे (वय 32, रा. खालूंब्रे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 23) फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्ती शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सावरदरी ते एचपी चौक या मार्गावरून पिकअप गाडी घेऊन जात होता. त्यावेळी आरोपींनी त्यांची कार (एम एच 12 / जी एफ 9618) पिकअपला आडवी लावली. पिकअप चालकाला खाली ओढून ‘गाडी कारला धडकवलीस. तुला गाडी नीट चालवता येत नाही का’ अशी दमबाजी करत कारमधील तिघांनी शिवीगाळ केली.

त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने पिकअप चालकाला पिकअपच्या मागील बाजूला नेऊन पिकअपच्या हौदाच्या लोखंडी पोलवर त्याचे चार ते पाच वेळा डोके आपटून गंभीर जखमी केले. पिकअप चालक निपिचीत पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजून आरोपी तिथून कारमधून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare