पिंपळे सौदागर येथे हॉटेलमधील बाऊन्सरची ग्राहकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

36

पिंपळे सौदागर येथे हॉटेलमधील बाऊन्सरने आणि व्यवस्थापकाने एका ग्राहकालाच किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. ७) रात्री बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील ‘स्पॉट १८’ या पबहॉटेलमध्ये घडली.

गणेश विठ्ठल पिदुलकर ( वय २८, रा. हिंजवडी) असे मारहाण झालेल्या गिराईकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने ‘स्पॉट १८’ पब व हॉटेलचा व्यवस्थापक आणि बाऊन्सर विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर परिसरात ‘स्पॉट १८  पब व हॉटेल’ आहे. यामध्ये गणेश आणि त्याचे काही  मित्र-मैत्रिण शनिवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेले होते. पबच्या नियमानुसार त्याने सर्व पैसे भरले होते. सुरुवातीला त्यांनी चायनीज फूड खाल्ले, त्यानंतर त्यांनी जेवण मागवले. त्यावेळी हॉटेल बंद होण्याची वेळ झाली होती. गणेशकडे हॉटेलमधील जेवणाचे कूपन होते. व्यवस्थापकाने त्यांना दुसऱ्या दिवशी कूपन वापरण्यास सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी कूपन चालणार नसल्याने गणेश आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये बाचाबाची होऊन मारहाण झाली. यावेळी व्यवस्थापक आणि बाउन्सर यांच्यात झालेल्या मारहाणीत गणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसांनी  बाऊन्सरसह हॉटेल व्यवस्थापकाला अटक केली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.