पिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर

3235

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – रस्त्यावर नेत्यांच्या वाढदिवसाचे, पक्षाच्या कार्यक्रमाचे, लग्नाच्या वाढदिवसाचे ते अगदी घरातील पाळीव प्राण्याला शुभेच्छा देणारे फलक तुम्ही बघितले असतील. मात्र  पिंपळे सौदागर येथे एका प्रेमवेड्याने ‘shivade i am sorry’ असे फलक लावून आपल्या प्रेयसीची माफी मागीतली आहे. यामुळे शहरभरात हा चर्चेचा विषय झाला आहे.  हे पोस्टर कोणी आणि कोणासाठी लावले आहेत हे प्रश्न सध्या शहरातील नागरिकांना सतावत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘shivade i am sorry’ असे फलक लागले आहेत. बॅनरवरील मजकूर पाहता हा एखाद्या प्रेमवीराचा प्रताप असावा असे दिसते. हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून बॅनरचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे बॅनर कोणी लावले, ही ‘शिवदे’ कोण आहे, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित होर्डिंग मालकाला ठाण्यात बोलावून चौकशी केली असता ते फलक आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या एका शॉर्ट फिल्मचे असल्याचे उघड झाले आहे. हे फलक लावण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र परवानगी घेतली नसल्याने ही फ्लेक्सबाजी निर्मात्यांना महागात पडणार आहे. यामुळे नागरिकांना पडलेल्या सर्व प्रश्नांना पूर्णविराम लागला आहे.