पिंपळे गुरव येथे गॅस गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात वृध्द दांपत्य गंभीर भाजले

53

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – गॅस गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात वृद्ध दांपत्य गंभीर भाजून जखमी झाले आहे. ही घटना आज (बुधवार) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पिंपळे गुरव येथील ओम साई सृष्टी चौका जवळ घडली.

प्रभाकर नगरकर (वय ६०) आणि आशा नगरकर (वय ५८, दोघे.रा. ओम साई सृष्टी चौक, पिंपळे गुरव) अशी स्फोटात जखमी झालेल्या वृद्ध  दांपत्यचे नाव आहेत.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री स्वयंपाक झाल्यानंतर नगरकर यांचा घरातील गॅस सुरूच राहिला. जेवण झाल्यानंतर दोघेही झोपले. मध्यरात्री प्रभाकर लघुशंकेसाठी उठले. दरम्यान, गॅस संपूर्ण घरात पसरला होता. त्यांनी घरातील दिवा लावला. त्यावेळी लिकेज झालेल्या गॅसचा जोरदार स्फोट झाला. यामध्ये नगरकर दांपत्य गंभीररित्या भाजले. घटनेची माहिती मिळताच वल्लभनगर अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विजवून जखमी प्रभाकर आणि आशा यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे.