पिंपळे गुरवमध्ये मुलांना भेटू न दिल्याने जावयाची आत्महत्या; सासरकडचे मंडळी पसार

170

सांगवी, दि. १९ (पीसीबी) – पत्नीसह सासरकडच्यांनी जावयाला मुलांना भेटू न देता मारहाण केली. तसेच धमकावल्याने निराश झालेल्या जावयाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात शनिवारी सकाळी पाऊणे आठच्या सुमारास घडली.

सुरेश लोखंडे असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी विनोद लोखंडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सासू श्रीमती दुर्गाबाई शिंदे, मेहुणा समाधान शिंदे, सचिन शिंदे यांच्यासह साडू महेश लोखंडे आणि त्याचा मुलगा गणेश लोखंडे या सर्वांवर अत्महत्या करण्यास प्रवृत्ती केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुरेश यांची पत्नी छाया या चाकण येथे माहेरी राहतात. त्यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद होते. मयत सुरेश यांचा साडू आरोपी महेश लोखंडे यांचा मुलगा आरोपी गणेश लोखंडेचा लग्न सोहळा आज (दि.१९) रोजी होते. त्यामुळे सुरेशची पत्नी छाया, तीन मुले, सासू आणि दोन मेहुणे हे गेल्या बुधवारी पिंपळे गुरव परिसरातील राहते घरी आले होते. तेव्हा, सुरेश हा मुलांना भेटायला गेले असता पत्नीने भेटू दिले नाही. त्यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाला. तेवढ्यात सासू, साडू, मेहुणे आणि गणेश यांनी सुरेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर नवरदेवासह आरोपींनी सुरेशच्या घरी येऊन लग्न झाल्यानंतर बघून घेऊ अशी धमकी दिली होती. यामुळे तणावात असलेल्या सुरेश याने शनिवारी सकाळी पाऊणे आठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून सासूला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. तर, इतर सर्व आरोपी सध्या फरार आहेत. सांगवी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.