पिंपळेसौदागर भाजी मंडईतील गाळ्यांचे भाजी विक्रेत्यांना वाटप करा – नगरसेवक नाना काटे

106

चिंचवड, दि. २० (पीसीबी) –  पिंपळेसौदागर येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाजी मंडई वापराविना पडून असून उद्घाटनाचा प्रतीक्षेत आहे. या मंडईतील गाळ्यांचे वाटप करून पिंपळेसौदागरमधील ठिकठिकाणच्या भाजी विक्रेत्यांचे तेथे स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 

यासंदर्भात नगरसेवक काटे दाम्पत्याने आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेच्या वतीने पिंपळेसौदागर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाजी मंडई उभारण्यात आली आहे.  लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली ही मंडई गाळे वाटपाअभावी वापराविना पडून आहे. भूमी आणि जिंदगी विभागाच्या उदासीनतेमुळे गाळेवाटप रखडलेले आहे. त्यामुळे ही मंडई बांधण्यासाठी झालेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. या भाजी मंडईचा वापर होत नसल्यामुळे तेथे गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपळेसौदागर परिसरातील लोकसंख्या पाहता नागरिकांना भाजीपाला व फळे खरेदी करण्यासाठी पिंपरी भाजी मंडई अथवा आठवडे बाजारामध्ये जावे लागते. तसेच परिसरात अनधिकृत पथारी भाजी विक्रेत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. अशा रस्त्यावरील अनधिकृत पथारीवाल्यामुळे रहदारीस व वाहतुकीस अडथळा येत असून, वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत आहे. महापालिकेने बांधलेली मंडई कार्यान्वित झाल्यास पिंपळेसौदागरमध्ये रस्त्यांच्या कडेने आणि चौकाचौकांत भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण कमी होईल. वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होईल. त्यामुळे येथील भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर करून पिंपळेसौदागार हॉकर्स मुक्त करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”