पिंपळेसौदागरमध्ये सोसायटीच्या पार्किंगमध्ये महिला कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले

767

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – एका महिला कार चालकाने ती राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमध्येच दुचाकीस्वाराला जोरदार धडक देऊन जखमी केले. ही घटना रविवारी (दि.२६) दुपारी पावणेएकच्या सुमारास पिंपळेसौदागर येथील गणेशम फेज-२ या रहिवासी वसाहतीतील गेस्ट पार्किंगमध्ये घडली.

शिवाजी तुळशीराम पाचपुते (वय ५६, रा. गणेशम फेज-२, पिंपळेसौदागर) असे अपघातात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारचालक सोनाली विजय अनंतवार (रा. गणेशम फेज-२, पिंपळेसौदागर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी पाचपुते आणि आरोपी कारचालक महिला सोनाली हे दोघेही पिंपळेसौदागर येथील गणेशम फेज-२ या रहिवासी वसाहतीत राहतात. रविवारी पाचपुते हे त्यांच्या सोसायटीच्या गेस्ट पार्किंगमधून आपली (एमएच/१७/एस/६३१८) क्रमांकाची दुचाकी काडत होते. यावेळी सोनाली यांनी त्यांच्या ताब्यातील (एमएच/१४/ईयू/३८५४) या क्रमांकाची कार भरधाव वेगाने चालवून पाचपुते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये पाचपुते हे गंभीर जखमी झाले असून सोनाली यांची सासू विद्या अनंतवार या देखील जखमी झाल्या आहेत. सांगवी पोलिस तपास करत आहेत.