पिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात

5952

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – प्रेयसीशी किरकोळ वादातून भांडण झाल्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी प्रियकराने चक्क शहरभरातील रस्त्यावर होर्डिंग्ज व इलेक्ट्रिक खांबांवर बोर्ड लावले. त्यावर मोठ्या अक्षरात ‘शिवडे, आय एम सॉरी’ असा मजकूर लिहिलेला होता. पोलिसांनी बॅनर लावणाऱ्यांचा शोध घेत दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

नीलेश संजय खेडेकर (वय २५, रा. घोरपडी, पुणे) आणि आदित्य विलास शिंदे (वय २२, रा. चिंचवड) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. कल्पतरू चौक ते पिंपळे सौदागरदरम्यान मोठ्या प्रमाणात बॅनर आणि होर्डिंग्ज लागल्याने पोलिसांनी दोघांकडे विचारणा केली. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना एक शॉर्टफिल्म तयार करत असून त्याच्या प्रमोशनसाठी बॅनर लावल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शॉर्टफिल्मबाबत सविस्तर माहिती देताना त्यांचे पितळ उघडे पडले.

चौकशीत पोलिसांनी आदित्यची सखोल विचारपूस केली. तेव्हा, मित्र नीलेश खेडेकरचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झाले होते. ती मुंबईवरून पिंपळेसौदागर येथे घरी येणार असल्याने तिची माफी मागण्याकरिता नीलेशने त्या मार्गावर बॅनर आणि होर्डिंग्ज लावले आहेत, अशी कबूली आदित्यने यावेळी दिली. हे होर्डिंग्ज बेकायदेशीरपणे लावल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेला बॅनर काढण्याची सूचना केली आहे.