पिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

105

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – पिंपळेनिलख, विशालनगर येथे आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा ११ वा वर्धापनदिन रविवारी (दि. २१) उत्साहात साजरा करण्यात आला. संघाच्या वार्षिक अहवालाचे भाजप नगरसेविका आरती चोंधे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

विशालनगरमधील विद्या विनय निकेतन विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. नगरसेविका आरती चोंधे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड उपस्थित होत्या. संध्या विद्यासागर यांनी संघाच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. या कार्यक्रमात ८० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक भाईदास पाटील, अच्युत पेठे, रमेश भांगे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. पडित विद्यासागर यांचे “बदलती परिस्थिती आणि ज्येष्ठ नागरिक” या विषयावर व्याख्यान झाले. ज्येष्ठ नागरिकांनी वाढत्या वयानुसार आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये कसे बदल करावेत याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष सुधाकर वेदपाठक यांनी केले. उषा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी स्मिता आपटे, सुनंदा कुलकर्णी, अजित धामणकर, पुरुषोत्तम दोमकुंडवार यांनी परिश्रम घेतले.