पिंपळेगुरवमध्ये रविवारी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  स्नेहमेळाव्याचे आयोजन

65

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) –  पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात रविवारी (दि. १९) कलावंत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्नेहमेळावा दुपारी १२ ते रात्री ११ च्यादरम्यान होणार असून यावेळेत विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विविध क्षेत्रातील कलावंतांची शोभायात्रा पी.डब्लू.डी. मैदान येथून निळु फुले नाट्यगृहपर्यंत काढण्यात येणार आहे. तसेच उद्घाटन समारंभानंतर सांस्कृतीक कार्यक्रमांमधून सुप्रसिद्ध सिने, नाट्य व लोक कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंतांच्या कलेचे सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्राची लोकधारा, भव्य लावणी महोत्सव, ओल्ड इज गोल्ड, संगीत रजनी यांसह विविध वाद्यवृंदांच्या साथसंगतीने अनेक कलाकारांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी विविध कलाकिर्तीतले नामांकित कलावंत उपस्थित राहणार आहेत.