पिंपळेगुरवमध्ये पूर्ववैमनस्यातून एकावर कोयत्याने वार; दोघे आरोपी अटक

1475

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चार जणांच्या टोळक्यांनी तिघाजणांवर हल्ला करुन एकावर कोयत्याने वार करुन त्याचा हात फ्रॅकचर केला आहे. ही घटना सोमवार (दि.३) रात्री दहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील कृष्ण चौक येथे घडली.

वैभव देवराम झांजरे (वय २०, रा. शिवगणेश रेसीडेन्सी, ए-३, काशी विश्वेश्वर स्कुल समोर, पिंपळे गुरव) असे कोयत्याने वार होऊन हात फ्रॅकचर झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार गणेश मोटे, पप्पु गायकवाड, सोन्या पाटील, आणि अश्विन चव्हाण या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी वैभव हा त्यांचे मित्र संकेत भोसले आणि आकाश कवडे यांच्यासोबत पिंपळे गुरव येथील कृष्ण चौकात उभा होता. यावेळी आरोपी गणेश, पप्पु, सोन्या आणि अश्विन या चौघांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन वैभव याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच आरोपी अश्विन, पप्पु आणि सोन्या या तिघांनी मिळून सिमेंटच्या कुंड्या आणि फरशीने वैभवला मारहाण करुन जखमी केले. तर आरोपी गणेश मोटे याने त्यांच्याजवळील धारदार कोयत्याने वैभवच्या डाव्या हातावर वार केला. या भ्याड हल्यात वैभव याचा हात फ्रॅकचर झाला आहे. पोलिसांनी गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण या दोघांना अटक केली आहे. तर पप्पु गायकवाड आणि सोन्या पाटील हे दोघे अद्याप फरार आहेत. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.जी.पाटील तपास करत आहेत.