पिंपरी महापालिकेने प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज मागविले; आठ प्रभागांवर २४ स्वीकृत सदस्यांची निवड होणार

98

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आठ प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरूवारी (दि. २८) जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समितीवर तीन जणांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या २४ कार्यकर्त्यांना प्रभागावर स्वीकृत सदस्य होण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या घरापुढे नावाचा फलक झळकणार आहे.

मिनी महापालिका असा घटनात्मक दर्जा मिळालेल्या क्षेत्रीय समित्यांना (प्रभाग समित्या) राजकीय महत्त्व  आहे. या समित्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होत असल्याने तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना याठिकाणी न्याय देणे शक्य असल्याने राजकीयदृष्ट्याही त्यांचे महत्त्व वाढले आहे. क्षेत्रीय समित्यांवर स्वयंसेवी संस्थांचे तीन प्रतिनिधी स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जातात. क्षेत्रीय कार्यालयांकडे येणाऱ्या अर्जांमधून त्यांची निवड केली जाते. त्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून निवड प्रक्रिया जाहीर करण्यात येते. महापालिका आयुक्तांकडून त्यासाठी एका अधिकाऱ्यालाही प्राधिकृत करण्यात येते.

त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आठ प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी गुरूवारी निवड प्रक्रिया जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे स्वीकृत सदस्य निवडीसाठी वर्तमानपत्रांमध्ये आणि महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार समाजकार्य करत असलेल्या बिनसरकारी आणि समाजलक्षी संघटनांच्या प्रतिनिधींकडून स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज करणाऱ्यांची संबंधित संघटना ही त्याच प्रभाग समितीच्या हद्दीत समाजकार्य करणारी असावी, संबंधित संघटनेचे तीन वर्षांचे लेखापरीक्षण झालेले असावे, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. प्रत्येक प्रभाग समितीवर तीन स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार शहरातील २४ जणांना स्वीकृत सदस्य होण्याची संधी मिळणार आहे. आठही प्रभाग समित्यांवर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडताना भाजपच्याच कार्यकर्त्याला संधी मिळणार हे उघड सत्य आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्या निवडण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत.

अर्ज करण्यासाठी ११ एप्रिल ही अंतिम मुदत असेल. महापालिकेच्या आठही प्रभाग कार्यालयांमध्ये आजपासून ते ११ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेपर्यंत स्वीकृत सदस्यपदाचा अर्ज उपलब्ध असेल. आलेल्या अर्जांची पडताळणी करून १३ एप्रिल रोजी वैध आणि अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एखाद्या अर्जाबाबत आक्षेप असेल, तर १७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदविता येईल. त्यानंतर २६ एप्रिल रोजी वैध ठरलेल्या अर्जांची यादी प्रभाग समितीच्या विशेष सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. त्यातून प्रभाग समितीचे सदस्य प्रत्येकी तीन स्वीकृत सदस्यांची निवड करतील.