पिंपरी महापालिकेतील चुकीच्या कामांविरोधात नगरसेविका सीमा सावळे यांनी खोचले पदर; आयुक्तांना धरले धारेवर

241

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – इंद्रायणीनगरमधील सुस्थितीत असलेले तीन रस्ते खोदून ते अद्ययावत करण्याच्या नावाखाली तब्बल १०० कोटी रुपयांचा चुराडा करण्यासाठी तरतूद वर्गीकरण करण्याच्या विरोधात भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी शुक्रवारी (दि. २२) झालेल्या सर्वसाधारण सभेत पदर खोचले. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि स्थापत्य विभागाला धारेवर धरत याचा जाब विचारला. शहरातील अन्य ठिकाणी रस्ते नसताना ते करण्याऐवजी सुस्थितीतील रस्त्यांवर १०० कोटीँचा खर्च टक्केवारीसाठी करत आहात का?, असे थेट सवाल त्यांनी आयुक्तांना केला. करदात्यांच्या पैशांचा चुराडा करण्याच्या या मुद्द्यावरून सावळे यांनी सभेत रौद्ररूप धारण केल्याने आयुक्त निरूत्तर झाले. महापौर नितीन काळजे यांनी ही सभा तहकूब केल्यामुळे आयुक्तांची सुटका झाली.

महापौर काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातील विविध कामांसाठी तब्बल २६५ कोटी रुपयांचे तरतूद वर्गीकरण करण्याच्या प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी देऊन सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी ठेवले होते. ऐनवेळी दाखल करण्यात आलेले हे प्रस्ताव सभेच्या शेवटी चर्चेसाठी सभागृहासमोर आले. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगरमधील इंद्रायणी चौक ते संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल ते तिरूपती चौक (३० कोटी), संकेत हॉटेल ते मराठा चेंबर्स पर्यंत (३० कोटी) आणि तिरूपती चौक ते विश्वेश्वर चौक (४० कोटी) हे तीन वेगवेगळे रस्ते अद्ययावतीकरण करण्यासाठी तब्बल १०० कोटींचे वर्गीकरण करण्याचा एक प्रस्ताव होता. त्यावरील चर्चेला भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनीच सुरूवात केली.

हे तीनही रस्ते सुस्थितीत आहेत. या रस्त्यांचे डांबरीकरणही झाले असून, पदपथही चांगल्या स्थितीत आहेत. या तीनही रस्त्यांवर एकही खड्डा पडलेला नाही. त्याचबरोबर सांडपाणीवाहिन्या, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी तयार केलेल्या वाहिन्या व अन्य सुविधा असताना या रस्त्यांचे अद्ययावतीकरण करण्याच्या गोंडस नावाखाली करदात्या नागरिकांचे तब्बल १०० कोटी रुपये का उधळले जाणार आहेत?, मुळात हे रस्ते प्राधिकरणाच्या हद्दीतील असताना त्यावर महापालिका कोट्यवधी रुपये का खर्च करणार आहे?, शहराच्या अन्य भागातील अनेक रस्ते विकसित नाहीत. अशा रस्त्यांचा विकास करण्याचे सोडून सुस्थितीतील रस्ते करण्यासाठी तुम्हाला कोणी सुपारी दिली?,असे प्रश्न सावळे यांनी उपस्थित केले.

या प्रकरणावर आयुक्तांनीच सभागृहात खुलासा करावा, अशी ठाम भूमिका सावळे यांनी घेतली. त्यामुळे महापौर नितीन काळजे यांनी आयुक्तांना खुलासा करण्यास सांगितले. त्यानुसार आयुक्तांनी खुलासा करताना तांत्रिक तपासणी करूनच स्थापत्य विभागाने इंद्रायणीनगरमधील तीनही रस्ते अद्ययावत करण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले. तसेच याबाबत शहर अभियंता अंबादास चव्हाण अधिक खुलासा करतील, असे सांगून त्यांनी स्थापत्य विभागावर हा विषय ढकलला. त्यानंतर शहर अभियंता चव्हाण यांनी खुलासा करताना गेल्या आठ वर्षापासून या रस्त्यांचे डांबरीकरण झाले नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात या रस्त्यांचे दोन वर्षापूर्वीच डांबरीकरण झाल्यामुळे स्वतः शहर अभियंत्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचा संताप सीमा सावळे यांनी व्यक्त केला. तसेच टक्केवारीसाठी हे सर्व करताय का?, असा थेट प्रश्न त्यांनी आयुक्तांना विचारला.

अधिकारी खोटी उत्तरे देत असल्यामुळे सावळे या प्रचंड संतापल्या. त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले. इंद्रायणीनगर प्रभागाचे राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक विक्रांत लांडे यांनी देखील हे तीनही रस्ते सुस्थितीत असताना त्यावर पुन्हा १०० कोटींचा खर्च केला जाणार असेल, तर त्याला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. शहराच्या अन्य भागातही कामांची आवश्यकता आहे. त्यामुळे १०० कोटींचा निधी अन्यत्र वापरावा, अशी सूचना त्यांनी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी देखील सुस्थितीतील रस्त्यांवर १०० कोटींचा खर्च करून ते दुबईला जोडणार आहात का? असा उपहासात्मक प्रश्न आयुक्तांना केला. त्यामुळे आयुक्तांसोबत महापौर नितीन काळजे यांचीही कोंडी झाली. त्यामुळे त्यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. त्यानंतर सभेला सुरूवात होताच महापौरांनी बुधवारपर्यंत (दि. २७) सभा तहकूब केल्याने आयुक्त हर्डीकर यांची सुटका झाली.